कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ - नरसिंहगाव रस्त्यावरील महांकाली सहकारी साखर कारखान्यापासून काही अंतरावर एका हॉटेलसमोर एका 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला. बाबासाहेब धनराज कांबळे (रा. विद्यानगर, कवठेमहांकाळ) असे मृताचे नाव आहे. मृत्यूच्या कारणाबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. 2 मे रोजी रात्री 11 ते 12 च्या सुमारास ही घटना घडली. बाबासाहेब कांबळे हे हॉटेल शिवार लॉजिंगसमोर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांचे मित्र अजित शिवाजी रायजादे यांनी त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव पाटील आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.