कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी छापा टाकून 2 किलो 882 ग्रॅम गांजा जप्त केला. इम्रान उस्मान सनदे (वय 32, रा. झुरेवाडी रोड, कवठेमहांकाळ) याला अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगलीचे सोमनाथ गुंडे यांनी फिर्याद दिली.
सनदे हा दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. त्याच्याकडून 72 हजार 50 रुपये किमतीचा 2 किलो 882 ग्रॅम वजनाचा गांजा व दुचाकी (एमएच 10 -7175) असा एकूण 3 लाख 2 हजार 150 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित इम्रान सनदे याने जयसिंगपूर स्टेशनजवळील समीर नकाशे याच्याकडून गांजा खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी पोलिस ठाण्यात हजर होऊन वर्दी दिल्यानंतर गुन्हा दाखल करणेत आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत. या कारवाईमुळे कवठेमहांकाळ परिसरामध्ये गांजा तस्करीवर पोलिसांनी मोठा घाव घातल्याची चर्चा सुरू झाली आहे.