महेश देसाई / कवठेमहांकाळ : अपघात झाला... जखमी रस्त्यावर पडले... नातेवाईकांची धावपळ सुरू झाली... आणि काही मिनिटांत ‘१०८’ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जीव वाचविण्यासाठी शासनाची ही रुग्णवाहिका जखमीला घेऊन धावते; मात्र ही धाव शासकीय रुग्णालयाकडे जाते, की खासगी रुग्णालयाकडे, हा प्रश्न आता कवठेमहांकाळ तालुक्यात गंभीर बनला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातून रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्ग, तसेच गुहागर–विजापूर राज्य मार्ग जातो. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. अशा स्थितीत ‘१०८’ रुग्णवाहिका ही नागरिकांसाठी महत्त्वाची आपत्कालीन सेवा आहे. मोरगाव येथे अग्रणी नदीवरील पुलावर अलीकडेच अपघात झाला. या अपघातातील जखमींना ‘१०८’ रुग्णवाहिकेतून मिरज–सांगली मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली.
कवठेमहांकाळ, मिरज, सांगली येथे शासकीय आरोग्य यंत्रणा उपलब्ध असताना जखमींना थेट
खासगी रुग्णालयात नेण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णाला कोणत्या रुग्णालयात दाखल करायचे, याचा निर्णय कोण घेतो? रुग्णवाहिका कर्मचारी, की नातेवाईक? जखमींना ठराविक खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला जातो का? यामागे वैद्यकीय गरज असते, की आणखी काही?
‘१०८’ रुग्णवाहिका ही सर्वसामान्यांच्या जिवाशी जोडलेली सरकारी सेवा आहे. शासकीय रुग्णालय उपलब्ध असताना जखमींना वारंवार खासगी रुग्णालयात नेले जात असेल, तर प्रशासनाने कारण स्पष्ट केले पाहिजे. १०८ च्या कर्मचाऱ्यांचे कोणत्याही खासगी रुग्णालयाशी हितसंबंध आहेत का, याची चौकशी झाली पाहिजे. जीपीएस व रुग्णालयातील दाखल नोंदी तपासल्यास वस्तुस्थिती समोर येईल.- प्रा. अर्जुन कर्पे, पंचायत समिती सदस्य, कवठेमहांकाळ
‘१०८’ रुग्णवाहिका ही आपत्कालीन वैद्यकीय सेवा आहे. अपघातग्रस्तांना प्रकृतीनुसार तातडीने आवश्यक उपचार मिळणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे. खासगी रुग्णालयात नेण्याबाबत तक्रारी असल्यास वस्तुनिष्ठ चौकशी केली जाईल. जीपीएस नोंदी, रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांची माहिती आणि संबंधित रुग्णालयातील दाखल नोंदी तपासल्या जातील. रुग्णांना विनाकारण विशिष्ट रुग्णालयाकडे वळविल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.- डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली