कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी येथील भारत इराप्पा कर्पे (वय 58) यांचा त्याची पत्नी नीलाबाई कर्पे हिने प्रियकर बाबाजी गोविंद कर्पे याच्या मदतीने खून केला व त्यांनी आत्महत्या केल्याचे दाखविण्याचा केलेला बनाव कवठेमहांकाळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्यामुळेच पतीचा कायमचा काटा काढण्याचा हा थंड डोक्याने रचलेला कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार रवी गोसावी यांच्या फिर्यादीवरून कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पत्नी नीलाबाई, प्रियकर बाबाजी कर्पे, मनोज भारत कर्पे, अनिकेत भारत कर्पे अशा एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. दि. 28 मार्चरोजी रात्री नीलाबाई आणि बाबाजी या दोघांनी भारत कर्पे यांना राहत्या घरी काठी आणि पाईपने बेदम मारहाण केली. त्यानंतर गळा दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव दाखवण्यासाठी मृतदेह घराजवळील खिडकीला पाईपने गळफास घेतल्याप्रमाणे लटकवण्यात आला. त्यानंतर संशयितांनी मृतदेह कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात नेऊन डॉक्टरांना, ‘दारू पिऊन मृत्यू झाला’, अशी खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता घाईघाईने अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांनी प्राथमिक चौकशीत याबाबत संशय आल्यानंतर तपास अधिक सखोल करण्यात आला आणि अखेर हा खून असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावरील परिस्थिती, मृतदेहाची स्थिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमधून या गुन्ह्याचे गूढ उलगडत गेले. तपास पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे करीत आहेत.
अनैतिक संबंधात अडथळा आल्याने काढला काटा
संशयित नीलाबाई आणि बाबाजी यांनी संगनमत करून भारत कर्पे यांचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा निर्माण होत असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. कटात त्यांची मुले मनोज आणि अनिकेत यांनीही सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे.