सांगली : कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्याच्या क्रूर हत्येनंतर निराधार झालेल्या मनोज आणि मनाली या त्यांच्या दोन्ही मुलांचे पालकत्व महाराष्ट्र शासनाने घ्यावे, तसेच यातील आरोपीला फाशीवर लटकावेपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
कुपवाड येथील मनीषा केसरेकर व त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी सांगली आणि कुपवाड शहर बंद ठेवण्यात आले. या घटनेतील संशयित फरीद शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि त्याला फाशीचीच शिक्षा द्यावी, आदी मागण्यांसाठी शहरात सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सायंकाळी महापालिकेसमोर आला असता त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून त्याचे सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी आमदार बोलत होते. या मोर्च्यात मोठ्या संख्येने नागरिक, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. यापुढे अशा हल्ल्यांचा संघटितरीत्या मुकाबला करू. हल्लेखोराला मनोरुग्ण म्हणून कोणी बचाव करीत असेल, तर त्याला सोडणार नाही. राजसत्तेपेक्षा हिंदूंचे संघटन महत्त्वाचे आहे. ही घटना सर्वांनी आपली समजली पाहिजे. यामध्ये निराधार झालेल्या दोन्ही मुलांचे पालकत्व महाराष्ट्र सरकारने घेतले पाहिजे. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची शैक्षणिक अर्हता पाहून त्यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे, अशी आमची मागणी असून, यासाठी आमचा पाठपुरावा असणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येईल.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, हिंदूंवरील हल्ले रोखण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एक झाले पाहिजे. अशा हल्लेखोरांची आर्थिक रसद तोडून त्यांना एकटे पाडले पाहिजे. या घटनेबाबत सरकार आपले काम करेल, पण यांना फाशीची शिक्षा लागेपर्यंत आमचे प्रयत्न राहतील. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, हिंदूंचा अंत पाहू नका. आमचा संयम संपला तर खूपच महागात पडेल. निष्पाप केसरेकर कुटुंबीयांचा काहीही दोष नसताना त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली. या कुटुंबीयांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे राहू. त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सोडणार नाही. यावेळी नानासाहेब वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्च्यात सहभागी नागरिकांनी, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. मोर्चादरम्यान 'केसरेकर कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे', 'आरोपीला फाशी झाली पाहिजे', अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चा दत्त-मारुती रोड, हरभट रोड, कापडपेठमार्गे महापालिकेसमोर आला. मोर्चामध्ये केसरेकर यांचा मुलगा मनोज, मुलगी मनाली आणि त्यांच्या हेब्बाळ (जि. बेळगाव) येथील नातेवाईक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मोर्चामध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, भाजपाच्या नेत्या नीता केळकर, पृथ्वीराज पवार, बेळगाव येथील श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर, प्रकाश ढंग, विकास सूर्यवंशी, शिवाजी डोंगरे, मकरंद देशपांडे, सूरज पवार, भारती दिगडे, मंजिरी गाडगीळ, केदार खाडिलकर, उत्कर्ष खाडे आदी सहभागी झाले होते.