कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर रस्ता ओलांडताना ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. वसंत शामराव माळी (वय ६०, रा. कासेगाव, ता. वाळवा) असे अपघातात मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी कासेगाव पोलिस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत माळी हे कासेगाव बसस्थानकाजवळून घराकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होते. त्या वेळी कराडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (केए ३५ बी ६४५७) त्यांना जोरदार धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने माळी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर मृत माळी यांचे पुतणे किरण जयसिंग माळी यांनी कासेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी ट्रक चालक रमेश डी. (रा. हाळेपेठे कदूर, जि. चिकमंगळूर, कर्नाटक) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.