नेर्ले : गुजरातहून केरळला पर्यटनासाठी निघालेल्या कुटुंबाची मोटार कासेगाव (ता. वाळवा) नजिक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूरू महामार्गावर घडला.
आनंदीबा किरीटसिंह चुडासमा (वय ४३, रा. अहमदाबाद, गुजरात) असे मृत महिलेचे नाव आहे. तर देवेंद्रसिंह दिलीपसिंह जडेजा आणि जोशनाबा देवेंद्रसिंह जडेजा (दोघे रा. सानंद रोड, अहमदाबाद) अशी जखमी दाम्पत्याची नावे आहेत. त्यांच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मोटारचालक अंकित अशोककुमार तन्ना (वय २८, रा. जलाराम निवास, अहमदाबाद शहर) याच्याविरोधात कासेगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी देवेंद्रसिंह जडेजा यांनी कासेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
चालक अंकित तन्ना हा मोटार (जीजे ३८ बीएल ५४४३) चालवत होता. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास कासेगावजवळ आले असता चालक अंकित याचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार थेट दुभाजकाला धडकून उलटली. या अपघाताचा अधिक तपास कासेगाव पोलिस करत आहेत.