कसबे डिग्रज : येथे लहान मुलांची भांडणे सोडवण्यावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून करण्यात आला. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे ही घटना घडली. तरुणास लाथा-बुक्क्यांसह काठीने मारहाण करत धारदार हत्याराने वार केले. सागर संजय गायकवाड (वय 30, रा. कसबे डिग्रज) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह संशयित तिघांना अटक केली आहे. संस्कार सचिन आळतेकर (19, रा. आदिनाथनगर, चौथी गल्ली, कसबे डिग्रज) व हर्षवर्धन गिरीश चव्हाण (19, रा. इंदिरा निवास, गणपती मंदिरजवळ, कसबे डिग्रज) अशी संशयितांची नावे आहेत.
रविवारी, 26 एप्रिल रोजी सायंकाळी धैर्यशील करंटे यांच्याकडे एका अल्पवयीन मुलाने बघितले, म्हणून त्यांनी ‘काय पाहतोस?’ असे विचारले. तेव्हा त्याने ‘थांब तुला दाखवतो, काय पाहतो ते...’ अशी धमकी दिली व निघून गेला. त्यानंतर धैर्यशील हा सागरसोबत होता. त्या ठिकाणी संस्कार, अल्पवयीन मुलगा व हर्षवर्धन असे तिघे आले. त्यांनी सागरला काठीने मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास सागर समडोळी रोडवरील खराटे यांच्या शेताजवळ गेला असता, त्यावेळी तिघेजण त्या ठिकाणी गेले.
संस्कारने त्याच्याकडील हत्याराने सागरच्या छातीवर आणि डोक्यात वार केले. उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. सांगली शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप भागवत, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी पथकासह येऊन पाहणी केली. याप्रकरणी संदीप नारायण गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
अनेक दिवसांपासून वाद
सागर गायकवाड आणि संशयित यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. रविवारी तो पुन्हा उफाळला. वाद संपवूया, असे सांगतच सागरचा खून केला, असे पोलिसांनी सांगितले.