जत : करजगी (ता. जत) येथे अकस्मात लागलेल्या आगीत शेतकरी जंगप्पा मल्लाप्पा जंगमशेट्टी यांच्या शेतातील सुमारे चार एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ऊस पिकासोबतच ठिबक सिंचनाचे साहित्य व पाईपही जळून खाक झाल्या आहेत.
पावसाअभावी ऊस पीक वाचविण्यासाठी जंगप्पा जंगमशेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. तसेच शेतात ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अचानक आग लागल्याने काही वेळातच चार एकरांवरील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीत ड्रीपच्या नळ्या, पाईप व सिंचनाचे साहित्यही जळून मोठे नुकसान झाले.
या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित यंत्रणेने तातडीने नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून शेतकरी जंगप्पा मल्लाप्पा जंगमशेट्टी यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत संबंधित यंत्रणेकडून तपास करण्यात येत आहे.