जत : करजगी (ता. जत) येथे कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्हा आरोग्य पथकाने थेट 'स्टिंग ऑपरेशन' करून बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला. याप्रकरणी संशयित बोगस डॉक्टर संजय वाघमारे याच्याविरुद्ध उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तो घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याच्याकडून गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारी मशिनरी व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आठ दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील बागलकोट येथील एका महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या घटनेचे कर्नाटक सरकारने गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीच्या तपासात मृत महिलेचे गर्भलिंग निदान आणि गर्भपात जत तालुक्यातील सीमाभागात झाल्याचे उघडकीस आले.
त्यानुसार कर्नाटकच्या स्टेट नोडल ऑफिसर शोभा टी. आर., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुवर्णा कुलकर्णी आणि कविता बडनावर यांच्या पथकाने जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील मध्यस्थ धान्नाक्का तेली या महिलेला गाठले. बनावट रुग्ण बनवून हे पथक करजगी येथील एका मळ्यातील ठिकाणावर पोहोचले. त्या ठिकाणी संशयित बोगस डॉ. संजय वाघमारे हा लिंगनिदान करत असताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडून यंत्रणा ताब्यात घेतली. जतच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमा क्षीरसागर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर उमदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. नम्रता तळेकर यांनी फिर्याद दिली. उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.