शिराळा ः कणदूर (ता. शिराळा) येथे शेताला पाणी पाजत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जगन्नाथ बाळू गुंडणके (वय 55) हे शेतकरी गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जगन्नाथ गुंडणके हे शनिवारी सकाळपासून शेतात पाणी पाजत होते. दुपारी तीनच्या सुमारास बांधावरील हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी गुंडणके शेतात एकटेच होते. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखून हातातील खोरे बिबट्याच्या दिशेने फिरवले आणि मोठ्याने आरडाओरडा केला. यामुळे बिबट्याने त्यांच्या हाताचा चावा घेऊन तेथून पळ काढला. त्यांच्या या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. शिराळा वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्याशी चर्चा करून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची आणि जखमी शेतकऱ्याला जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली.
नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यात आणि विशेषतः वारणा नदीकाठच्या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने लोकभावना संतप्त आहेत. हा बिबट्या नरभक्षक होण्याची शक्यता असून, राज्य सरकारने केंद्र सरकारशी समन्वय साधून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अनिरुद्ध काकडे व डॉ. महिंद यांनी जखमीवर उपचार केले. यावेळी नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, माजी सरपंच रघुनाथ पाटील, वनपाल अनिल वाजे, रजनीकांत दरेकर, रेस्क्यू टीमचे कर्मचारी आणि कणदूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.