सांगली

Sangli Theft : कामेरीत एकाच रात्री पाच ठिकाणी दरोडा

३५ लाखांची लूट; महिलेला मारहाण; मुलीच्या गळ्यास चाकू लावला

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे एकाच रात्री पाच ठिकाणी सशस्त्र दरोडा घालून १७ ते १८ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे ऐवज आणि रोकड असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटले. दरोड्यावेळी एका ९ वर्षांच्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून कुटुंबातील सदस्यांना धमकवण्यात आले, तर तिच्या आजीला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संतोष खाशेराव परीट (रा. कामेरी) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कामेरी येथील महामार्गाच्या पूर्वेला असलेल्या उज्वला जाधव यांच्या घराचा मध्यरात्री कडीकोयंडा उचकटून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. उज्वला यांना मारहाण करीत त्यांच्या शेजारी झोपलेल्या ९ वर्षांच्या नातीच्या गळ्याला चाकू लावून धमकावले. उज्वला यांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेत इतर सोन्या-चांदीचे ऐवज व ३० हजारांची रोकड पळवून नेली.

विजय पाटील यांच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यांच्या आईने आरडाओरडा केली. विजय पाटील तेथे आले असता दरोडेखोरांनी शस्त्राची भीती दाखवून ‘दंगा केला तर मारून टाकू’ अशी धमकी दिली. विजय यांच्या आईची अर्धा तोळ्याची सोन्याची बोरमाळ हिसकावली. याशिवाय, बाबू नानाभाऊ आंधळे यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून सोन्या-चांदीचे ऐवज व २५ हजारांची रोकड लांबवली, तर सारिका राजेंद्र सोनावले यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरातील दीड तोळ्याचे ऐवज चोरून नेले.

पोलादनगर येथील संतोष खाशेराव परीट यांच्या घरात मागील दरवाजा उघडून चोरट्यांनी प्रवेश केला. संतोष परीट, त्यांची आई, पत्नी व मुलगी तिजोरीशेजारीच झोपले होते. चोरट्यांनी लोखंडी तिजोरीतील पेटी अलगद उचलून नेली. घरामागील २०० फूट अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात नेऊन ती पेटी फोडली. त्यातून १३ तोळे सोन्याचे दागिने आणि २१ हजारांची रोख रक्कम लंपास केली.

१३ तोळे सोने लांबवले..

पोलादनगर येथील संतोष परीट यांचे कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी तिजोरीतील पेटी उचलून नेली आणि जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेऊन फोडली. त्यातून १३ तोळे सोन्याचे दागिने आणि २१ हजारांची रोकड लंपास केली. या ठिकाणी चोरट्यांनी गुंगीच्या स्प्रेचा वापर केल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, साहाय्यक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे व गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोंडाला रुमाल बांधलेले तीन दरोडेखोर कैद झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT