सांगली : मिरज शहरातील निखिल विलास कलगुटगी याच्या खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यास अप्पर पोलिस महासंचालकांनी मंजुरी दिली आहे.
प्रथमेश सुरेश ढेरे (टोळी प्रमुख), विशाल बाजीराव शिरोळे, सर्फराज बाळासाहेब सय्यद, प्रतीक सचिन चव्हाण, करण लक्ष्मण बुधनाळे, गणेश ऊर्फ निहाल तानाजी कलगुटगी, सूरज चंदू कोरे, संग्राम राजेश यादव, सलीम गौस पठाण, चेतन सुरेश कलगुटगी, सोहेल ऊर्फ सुहेल जमीर तांबोळी, महंमद सिराज ऊर्फ सोहेल अब्बास आगलावणे, अक्षय सदाशिव कांबळे, दीप अश्विन ढेरे यांचा या टोळीमध्ये समावेश आहे. मिरज शहर पोलिस ठाण्यात निखिल कलगुटगी खूनप्रकरणी भारतीय न्यायसंहिता आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा करीत आहेत.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, प्रथमेश सुरेश ढेरे (वय 25) याने आपली एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. या टोळीने 2017 पासून परिसरात दहशत निर्माण करणे, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) सुनील फुलारी यांच्याकडे ‘मोक्का’चा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास फुलारी यांनी 13 जानेवारी 2026 रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर आता या 15 जणांविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुंबईतील अप्पर पोलिस महासंचालकांनी अंतिम परवानगी दिली आहे. या प्रकरणाचा तपास विटा उपविभागाचे पोलिस अधिकारी विपुुल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.