कडेगाव शहर : कडेगाव शहरासह तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला आता भक्कम ऊर्जा मिळणार आहे. कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे 30 खाटांवरून थेट 200 खाटांच्या सामान्य रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला आहे. शासनाने या प्रस्तावास मान्यता दिल्यास आरोग्य व्यवस्थेला चालना देणारा हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.
माजीमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे. सद्यःस्थितीत 30 खाटांची मर्यादित सुविधा असलेल्या ग्रामीण रुग्णालयात विविध आरोग्य सेवा देताना अडचणी येत होत्या. मात्र आता 200 खाटांच्या विस्तारामुळे अत्याधुनिक यंत्रणा, विशेष तज्ज्ञ डॉक्टर्स, आपत्कालीन सेवा आणि विविध वैद्यकीय विभागांची निर्मिती होणार आहे. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून या प्रकल्पाला निधी उपलब्ध होणार असून, शासनस्तरावर अंतिम निर्णय होण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच अधिकृत घोषणाही होण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संपूर्ण कडेगाव शहरासह तालुक्यातील आणि परिसरातील हजारो नागरिकांना लाभ होणार असून, ग्रामीण भागातील आरोग्याची उपेक्षा दूर होण्याच्या दृष्टीने हा टप्पा मैलाचा दगड ठरणार आहे.
कडेगाव शहरासह तालुक्याच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालयात 200 खटांची सुविधा व्हावी. याबाबत आपण शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून हा विषय मांडला आहे. आज तो अंतिम टप्प्यात आहे, याचा आपणास आनंद आहे. लवकरच येथील नागरिकांना याचा लाभ मिळेल.डॉ. विश्वजित कदम आमदार