देवराष्ट्रे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेनंतर ऊस दराचे आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, वांगी, शिवणी येथे आंदोलनाची ठिणगी पडली असून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोडी बंद करून ऊस वाहतूक करणारी वाहने अडवल्याचे दिसून आले आहे. साखर कारखान्याने उसाला प्रति टन ५५०० भाव दिल्याशिवाय ऊसतोड व ऊस वाहतूक सुरू करू देणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे कडेगाव तालुका अध्यक्ष रामदास महिंद व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
स्वाभिमानीची ऊस परिषद नुकतीच पार पडली आहे. यामध्ये उसाला प्रति टन पाच हजार पाचशे रुपये भाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ऊसतोडी बंद करण्याचा व ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा स्वाभिमानीच्या नेत्यांनी दिला आहे. रविवारी सकाळी कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, वांगी, शिवणी या भागात स्वाभिमानीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऊसतोडी बंद करून व ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून आंदोलनाची ठिणगी पेटवली आहे.
देशभरात साखरेचा दर वाढला असतानाही कारखानदारांनी व सरकारने उसाला कमी एफआरपी जाहीर केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर केल्याप्रमाणे उसाला पाच हजार पाचशे रुपये प्रति टन दर जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक व ऊस तोडणी सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत कडेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेली ऊसतोड रोखली. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, उदगिरी साखर कारखाना आणि क्रांती साखर कारखान्यांसाठी ऊसतोड सुरू असलेल्या कडेगाव शहर, मोहिते वडगाव, चिंचणी, तडसर आदी गावांतील शेतशिवारांत कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला. ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आणि दराची कोंडी फुटेपर्यंत उसाचे कांडेही तोडू देणार नाही, असा इशारा संघटनेने दिला. या आंदोलनामुळे ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत, उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा, तसेच केंद्र सरकारने प्रतिटन पाचशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, यासाठी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. साखर कारखानदार आणि सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. ऊस दराचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय ऊसतोड सुरू होऊ देणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आगामी काळात ऊस दराच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, इम्रान पटेल, रामदास महिंद, अशोक पवार, राजेंद्र माने, तानाजी धनवडे, विलास कदम, चंद्रकांत देशमुखे, विठ्ठल कदम, भीमराव होनमाने सहभागी झाले होते.