सांगली

Sangli Tourism: कडेगावचे निसर्गवैभव घालतेय भुरळ

डोंगराई, चौरंगीनाथ, सागरेश्वर... पर्यटनाला उधाण

पुढारी वृत्तसेवा
रजाअली पिरजादे

कडेगाव शहर : सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या कडेगाव तालुक्याने पावसाळ्याच्या आगमनाने हिरवा शालू पांघरला असून, येथील डोंगर-दऱ्या, घाटरस्ते आणि धार्मिक स्थळांचे रमणीय रूप पर्यटकांना खुणावत आहे. डोंगराई मंदिर, चौरंगीनाथ देवस्थान आणि सागरेश्वर अभयारण्य या प्रमुख पर्यटनस्थळांवर सध्या भाविक व पर्यटकांची लक्षणीय गर्दी होत आहे.

हिरव्या शालूत डोंगराई

कडेगाव शहरापासून काही किलोमीटरवर असलेले डोंगराई मंदिर परिसर सध्या हिरवाईने बहरून गेला आहे. नागमोडी घाटमार्ग, विस्तीर्ण पठार, कडेगाव तलावाचे विहंगम दर्शन, तसेच वाघजाई व तरस गुहा यांमुळे हा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करीत आहे. भाविकांसाठी निवास व पिण्याच्या पाण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.

सागरेश्वरची वनरम्यता

मानवनिर्मित अभयारण्य म्हणून लौकिक असलेल्या सागरेश्वरमध्ये दाट वनराई, विविध वन्यप्राणी व पक्ष्यांचे दर्शन, तसेच देवताळ, वेणुविहार तलाव, घोडेबीळ आणि किर्लोस्कर पॉइंटसारखी आकर्षणे पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जात आहेत. पावसाळ्यात येथे ट्रेकिंगप्रेमींची विशेष वर्दळ असते.

चौरंगीनाथचे विहंगम दर्शन

सोनसळजवळील ऐतिहासिक चौरंगीनाथ देवस्थान हे सह्याद्रीच्या सान्निध्यात वसलेले एक नयनरम्य ठिकाण आहे. डोंगरमाथ्यावरून दिसणारी नागमोडी कृष्णा नदी, सोनहिरा खोऱ्याची हिरवाई आणि चिंचणी तलावाचे विहंगम दृश्य पर्यटकांच्या स्मरणात कायमचे घर करून जाते. याशिवाय सोनसळ खिंड व सुरली घाट परिसरानेही पावसाळ्यात नवे सौंदर्य धारण केले असून, छायाचित्रकार व निसर्गप्रेमींसाठी ही स्थळे विशेष आकर्षण ठरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT