सांगली

Shaktipeeth Highway : कडेगाव, खानापूर तालुक्यांमध्ये ‘शक्तिपीठ’ची मोजणी थांबवली

शेतकरी, महिलांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव/विटा : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित जमीन मोजणीवरून कडेगाव तालुक्यातील वांगी आणि शिरगाव परिसरात गुरुवारी शेतकरी व पोलिस प्रशासनात तीव्र संघर्ष झाला. आम्हाला गोळ्या घाला; पण आम्ही एक इंच ही जमीन देणार नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे व विरोधापुढे महसूल आणि मोजणी यंत्रणेला अखेर मोजणी न करताच माघारी परतावे लागले. शेतकऱ्यांच्या तीव्र विराेधामुळे प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी वरिष्ठांशी चर्चा करून मोजणी थांबवत असल्याची घोषणा केली. खानापूर तालुक्यातील भाळवणीतही शेतकरी आणि आंदोलकांनी मोजणी बंद पाडली.

वांगी (ता. कडेगाव) येथे शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी, विशेषतः महिलांनी जागोजागी एकत्र येत तीव्र विरोध केला. साळुंखे मळा, आरफळ कालवा, चव्हाण मळा, डाग मळा व जगदाळे मळा परिसरात मोजणीची तयारी करण्यात आली होती. मात्र, बाधित शेतकरी आणि महिलांनी आक्रमक पवित्रा घेत मोजणी यंत्रणा बाहेर काढण्यास विरोध केला. मोजणीसाठी आणलेले साहित्य उचलून पोलिस व्हॅनमध्ये ठेवण्यात आले. सकाळी प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर गुपचूप मोजणी करण्याचा प्रयत्नही शेतकऱ्यांनी हाणून पाडला. सुमारे २०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात होता.

वांगी येथील साळुंखे मळा येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ॲड. दीपक लाड, श्रीदास होनमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दुसरीकडे, शिरगाव येथेही शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून शेतकरी आणि पोलिस यांच्यात जोरदार संघर्ष व बाचाबाची झाली. महसूल अधिकारी आल्याशिवाय मोजणी थांबवता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्यानंतर तणाव वाढला. प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी शक्तिपीठला जोरदार विरोध केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT