कडेगाव : कडेगाव तालुका होऊन पंधरा वर्षे उलटून गेली, तरी कडेगावसाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात न आल्याने त्याचा त्रास शेतकर्यांना काही वर्षांपासून सहन करावा लागत आहे. सध्या शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘एक तालुका, एक बाजार समिती’चा निर्णय घेऊन निधी मंजूर केल्याने कडेगावला नव्याने बाजार समिती होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे चित्र सध्यातरी आहे.
कडेगाव तालुक्यात काही वर्षांपासून ताकारी, टेंभूचे पाणी आल्यापासून या भागातील शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. परंतु कडेगावसाठी स्वतंत्र बाजार समिती नसल्याने शेतकर्यांना त्यांच्या शेतातील भाजीपाला विटा, कराड किंवा अन्य ठिकाणी घेऊन जाणे भाग पडत आहे.सध्या खानापूर (विटा) बाजार समितीवर माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार सुहास बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. तरीही सर्वात जास्त संचालक व सभापतिपद पाच वर्षे आमदार डॉ. विश्वजित कदम गटाकडे राहणार असल्याने त्यांचा बाजार समितीवर वरचष्मा आहे.
प्रत्येक वेळेला बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र कडेगाव बाजार समितीचा मुद्दा विरोधकांकडून चांगलाच गाजवला जातो. परंतु निवडणुकीनंतर तो मुद्दा कागदावरच राहतो. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आघाडी सरकारच्या काळात कडेगाव - पलूस तालुक्यांची निर्मिती केली. तसेच कडेगाव व पलूस या ठिकाणी सर्व विभागाची प्रशासकीय कार्यालयांची निर्मिती केली. तसेच पलूससाठी स्वतंत्र बाजार समितीची निर्मिती झाली. परंतु कडेगाव तालुका पूर्वी दुष्काळी तालुका असल्याने म्हणावा तसा महसूल कडेगाव तालुक्यातून जमा होत नसल्याने स्वतंत्र बाजार समिती निर्माण झाली नाही. त्याचा त्रास शेतकर्यांना होत आहे.
दहा वर्षांपासून प्रत्येकवर्षी पणन संचालक विभागाकडे कडेगावसाठी स्वतंत्र बाजार समितीसाठी प्रस्ताव पाठविला जात आहे. सध्या खानापूर बाजार समितीच्या माध्यमातून कडेगावसाठी उपबाजाराची निर्मिती करण्यासाठी तडसर (ता. कडेगाव) हद्दीतील गायरान गट नं. 963 मधील पाच एकर जागा देण्यासाठी ग्रामपंचायतीने एकमुखी मंजुरी दिली आहे. अनेक वर्षांपासूनचा जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. परंतु महसूल प्रशासनाकडून त्या ठिकाणी उपबाजारासाठी जागेची मान्यता मिळालेली नाही.
कडेगाव येथे आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी भरणारा शेळ्या-मेंढ्यांचा बाजारही जागेअभावी मोहरम चौकात उघड्यावरच भरत आहे. तसेच म्हशी, गाई यांचा बाजार जागेअभावी भरविला जात नाही. परिणामी शेतकर्यांना जनावरे खरेदी-विक्रीसाठी विटा, कराड यासह अन्य ठिकाणी जावे लागते. परिणामी शेतकर्यांना त्याचा त्रास होतो.