सांगली : रेल्वे खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाची सुमारे 7 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बबन महादेव शिंदे (रा. पंचशीलनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी संशयित महादेव बाबा पुकळे (रा. कुमठे, ता. तासगाव), अनुराग पाटील आणि शर्मा नामक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी शिंदे यांचा किराणा मालाचा व्यवसाय आहे. त्यांच्याशी संशयितांनी ओळख वाढवून त्यांचा विश्वास मिळवला. त्यानंतर ‘तुमच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावतो’, असे सांगितले. मुलाला नोकरी लावण्यासाठी म्हणून मार्च 2020 ते एप्रिल 2023 यादरम्यान फिर्यादीकडून सुमारे 9 लाख रुपयांची रोकड घेतली.
फिर्यादीने संबंधित रक्कम ही संशयितांच्या बँक खात्यावर आणि एकदा रोखीने दिली. पण पैसे दिल्यानंतरही मुलाला नोकरी लावली जात नसल्याने फिर्यादी शिंदे यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर संशयितांनी दोन लाख रुपये परत दिले. परंतु उर्वरित सात लाख रुपयांची रक्कम देण्यास टाळटाळ केल्याने फिर्यादी शिंदे यांनी तक्रार दिली.