Job Fraud Pudhari
सांगली

Sangli job scam: नोकरीच्या आमिषाने वीस लाखाचा गंडा

सांगलीतील भामट्यावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दिल्लीत राष्ट्रपती भवन, आणि कार्यालयात ओळख असल्याचे सांगून, क्लार्क पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने निवृत्त कर्मचाऱ्याची 20 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी संशयित अजय बाबुलाल शहा (रा. महावीरनगर, वखारभाग, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला.

प्रकाश दिनकर संदे (वय 58, रा. धनकवडी, पुणे; मूळ रा. वडगाव, जि. सातारा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संदे हे पुण्यातील एका संस्थेतून निवृत्त झाले असून, सध्या वडगाव (ता. कराड) येथे वास्तव्यास आहेत. 2023 मध्ये त्यांची ओळख अजय शहा याच्याशी झाली. शहा याने ‌‘माझी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनात मोठी ओळख आहे, तेथे माझे सतत जाणे असते‌’, असे भासवले. संदे यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरात नेऊन त्यांचा विश्वास संपादन केला. संदे यांनी त्यांच्या ओळखीचे पंडित आकाराम गायकवाड (रा. शिराळा) आणि बाबासाहेब ज्ञानू नायकवडी (रा. चरण-कोकरूड) यांच्या मुलांना कायमस्वरूपी क्लार्क म्हणून नोकरीला लावण्याबाबत शहाशी चर्चा केली. यावेळी शहा याने नोकरीचे ठोस आश्वासन देऊन 20 लाख रुपयांची मागणी केली.

शहाच्या शब्दावर विश्वास ठेवून संदे यांनी त्याला 20 लाख रुपयांचा चेक दिला. 10 जानेवारी 2024 रोजी अजय शहा याने सांगलीतील बँक ऑफ बडोदामध्ये हा चेक वटवून पैसे काढून घेतले. मात्र, पैसे घेऊनही नोकरीबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने आणि शहा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे संदे यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित अजय शहाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT