सांगली

सांगली : विट्यात जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रवादीकडून निषेध

सोनाली जाधव

विटा : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याबद्दल आज (दि.३०) विट्यात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.

कडक कारवाई झाली पाहिजे…

महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलना दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. विट्यातही छत्रपती शिवाजी चौकात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसह भाजप आणि समविचारी पक्षांच्यावतीने आव्हाड यांचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी वैभव पाटील म्हणाले, आव्हाड यांच्या कृतीने त्यांनी फक्त निवडणुकीपुरताच डॉ. आंबेडकर यांचा वापर केला. त्यांचा वापर करूनच आजवर आपण मोठे झालात. परंतु आता तुमचे खरे रूप बाहेर आले आहे. सगळ्यांना गृहीत धरण्याची जी तुमची वृत्ती आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अशी कारवाई करत नसाल तर आपल्या संदर्भात सुद्धा लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. यांचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत असेही वैभव पाटील म्हणाले. दरम्यान यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य चौकातील पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश चोथे, शहराध्यक्ष भगवानराव पाटील, सुभाष भिगारदेवे, संदीप ठोंबरे, सुरज कांबळे, नंदकुमार भंडारे, सुमित भंडारे, नंदू कांबळे, संदीप मेटकरी, आनंदराव पाटील, प्रवीण डूबल, विक्रम अवघडे, चंद्रकांत दौडे, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT