Fraud Pudhari News
सांगली

Sangli Jeweller Fraud : सराफाची २.७७ लाखांची फसवणूक

​सांगलीतील प्रकार : बँक खाती गोठवल्याने सराफाला फटका

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : सराफ कट्ट्यावरील एका नामांकित ज्वेलर्समधून सोन्याची लगड खरेदी करून ऑनलाइन पैसे पाठवल्यानंतर संबंधित बँक खाती गोठवल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तरुणाविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत दादासाहेब नागरे (रा. शिरसाठवाडी, जि. अहिल्यानगर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सराफ व्यावसायिक सिद्धार्थ जीवन पेंडुरकर (वय ४७, रा. झुलेलाल चौक, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

संशयित नागरे याने पेंडुरकर यांच्या सराफ कट्ट्यावरील दुकानातून १९ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड खरेदी केली होती. त्यापोटी त्याने फिर्यादीच्या एचडीएफसी आणि बँक ऑफ बडोदा या दोन्ही बँक खात्यांवर रक्कम पाठवली. मात्र, संशयिताने ही रक्कम तिसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यातून फसवणुकीच्या माध्यमातून वळती करून सराफाला दिली होती.

सायबर क्राईम ब्रँचच्या तपासादरम्यान हा व्यवहार संशयास्पद आढळल्याने फिर्यादीची दोन्ही बँक खाती गोठवली गेली. यामध्ये सराफाची कोणतीही चूक नसताना त्यांना नाहक आर्थिक फटका बसला असून, त्यांची २ लाख ७७ हजार २१५ रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

राज्यातील पाच सराफांना गंडा!

सायबर क्राईम ब्रँच आणि पोलिस तपासामध्ये या फसवणुकीची कार्यपद्धती समोर आली आहे. संशयित संकेत नागरे याने स्वतःच्या खात्याऐवजी दुसऱ्याच्याच बँक खात्यातील सायबर फसवणुकीची रक्कम थेट सराफांच्या खात्यावर पाठवून सोने खरेदी केले आहे. अशाच प्रकारे त्याने आतापर्यंत राज्यातील पाच सराफ व्यावसायिकांची फसवणूक करून त्यांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहार स्वीकारणाऱ्या सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT