सांगली

Sangli Accident: जतजवळ ट्रकची मोटारीस धडक

ट्रक आणि मोटारीच्या भीषण अपघातात प्राचार्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर प्राचार्यांसह त्यांची दोन लहान मुले गंभीर जखमी झाली

पुढारी वृत्तसेवा

जत : ट्रक आणि मोटारीच्या भीषण अपघातात प्राचार्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर प्राचार्यांसह त्यांची दोन लहान मुले गंभीर जखमी झाली. जत-सांगोला मार्गावरील अचकनहळ्ळी फाट्याजवळ मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

राजश्री शामसुंदर कोळी (वय २५, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) असे मृताचे नाव आहे. त्यांचे पती प्राचार्य शामसुंदर कोळी यांचे हात व पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांची मुले शौर्य (वय ६) आणि वृषभ (वय ३) गंभीर जखमी आहेत. तिघे खासगी रुग्णालयात आहेत.

याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत नेताजी तानाजी कोळी (वय ४१, रा. तेरखेडा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या (जीजे ०६ बीवाय ३६५६) चालकाने अचकनहळ्ळी फाट्यानजीक भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारीस (एमएच २० एचएन २४४५) जोरदार धडक दिली.

अपघातानंतर ट्रक चालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता आणि पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात मोटारीचे नुकसान झाले. शामसुंदर कोळी जत येथील सिद्धार्थ पब्लिक स्कूलमध्ये प्राचार्य आहेत. ते कुटुंबासह जत येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी पहाटे ते मूळ गावाहून कुटुंबासह जतकडे येत असताना शहरापासून काही अंतरावर हा अपघात झाला. या दुर्घटनेमुळे जत शहरासह शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT