जत : जत तालुक्यातील विविध भागांतून एका २० वर्षीय तरुणीसह एक महिला, तिची दोन अल्पवयीन मुले, एक चालक आणि एक वृद्ध बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण सहा जण बेपत्ता झाल्याने चिंता व्यक्त होत असून जत व उमदी पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
तालुक्यातील बेळोंडगी येथील अक्षता प्रकाश कटगेरी (वय २०) ही ३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली. ती परत न आल्याने तिच्या आईने उमदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत, जत शहरातील विठ्ठलनगर परिसरातील संगीता प्रशांत धोतरे (वय ३२), श्रेयस प्रशांत धोतरे (वय १३) आणि कार्तिक प्रशांत धोतरे (वय ११) हे तिघे ४ जूनच्या रात्रीपासून बेपत्ता आहेत. तसेच, सिंगनहळ्ळी येथील वाहनचालक विष्णू विठोबा हिप्परकर (वय ५०) हे २० मे रोजी ‘मी गाडीवर जातो’ असे सांगून घरातून निघून गेले, मात्र त्यांचा अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही.
दरम्यान, शेड्याळ येथील महादेव सिद्धाप्पा गुगवाड (वय ७५) हे २७ मे रोजी उमराणी परिसरातून कोणालाही न सांगता निघून गेले. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी जकाप्पा विठ्ठल गुगवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.