जत : रास्ता रोको आंदोलनावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. 
सांगली

Sangli News| जत तालुक्यात वीज द्या, पाणी द्या, गुन्हेगारी मोडून काढा

विरोधकांचा रास्ता रोको ; महामार्ग तीन तास ठप्प; विकास फक्त कागदावर नको

पुढारी वृत्तसेवा

जत : जत तालुक्याला पाणी द्या, वीज पुरवठा सुरळीत करा आणि गुन्हेगारी मोडीत काढा यांसारख्या मागण्यांसाठी येथे गुरुवारी रास्ता रोको केला. पाणीटंचाई, दुष्काळ, म्हैसाळ योजनेचे पाणी, दुष्काळी सवलती, स्मार्ट मीटर तसेच अवैध धंद्यांच्या प्रश्नांवर महाराणा प्रताप चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय गुहागर मार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, तम्मनगौडा रवी-पाटील, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, सुजय शिंदे यांच्यासह सत्ताधारी वगळता सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी व नागरिक सहभागी होते.

उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करावे, पिण्याच्या पाण्याची टंचाई तातडीने दूर करावी, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीजपुरवठा करावा, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, जत तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत आणि जत तालुक्याचे नामांतर करू नये, अशा सात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. सरकार व प्रशासनावर टीका करत सावंत म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र जतच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. जनतेला पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हवा आहे. फक्त कागदी विकास नको, असल्याची टीका त्यांनी केली.

म्हैसाळचे आवर्तन, टँकरने पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा-पाणी, दिवसा वीज, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करणे, अवैध धंदे बंद करणे तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा सावंत यांनी दिला.

विलासराव जगताप म्हणाले, दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती दिल्या पाहिजेत. म्हैसाळ योजनेचे पाणी व्यवस्थित सोडले पाहिजे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत म्हैसाळच्या टप्प्यात जतला कायम पाणी मिळाले, मात्र नवीन आमदारांच्या कारकीर्दीतच तालुक्याला पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. तालुक्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हप्तेवसुली होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन नंबरवाल्यांबरोबर पोलिस स्टेशनमधील काही लोकही भागीदारीत धंदे करू लागले असल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकाराच्या चौकशीची मागणी जगताप यांनी केली. तहसील कार्यालय, तलाठी, ग्रामसेवक येथे पैसे घेतल्याशिवाय काम होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना पाणी द्यावे, म्हैसाळचे आवर्तन सुरू करावे व स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.

तम्मनगौडा रवि-पाटील म्हणाले, जत तालुक्यातील २७ तलाव कोरडे पडले असून चारा , पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेत असतानाही म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने जत तालुक्यातील परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने पाणी, चारा आणि सिंचनाची व्यवस्था करावी. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होईल. जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढे मुंबईपर्यंत धडक मारू, असा इशारा त्यांनी दिला. प्रकाश जमदाडे यांनी जत तालुक्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन ठप्प आहेत, ठिबक व कृषी अवजारे अनुदान मिळत नसून घरकुले रखडली आहेत. पीक विमा भरूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. पावसाअभावी पिके वाया गेली असून प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT