Earthquake file photo
सांगली

Earthquake News : जत तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

भिवर्गीत केंद्रबिंदू; रिश्टर स्केलवर ३.३ तीव्रतेची नोंद

पुढारी वृत्तसेवा

जत : जतपूर्व भागातील भिवर्गी परिसरात सोमवारी दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.३ इतकी नोंदवली गेली असून जमिनीखाली पाच किलोमीटर खोलीवर हा धक्का निर्माण झाला होता.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सोमवारी दुपारी १ वाजून ३६ मिनिटे व ५६ सेकंदांनी या भूकंपाची नोंद झाली. या घटनेचे अक्षांश १७.०८९० आणि रेखांश ७५.५७०० असे नोंदवण्यात आले असून, भिवर्गी गावाजवळ या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू होता.

जत तालुका हा प्रामुख्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या भागात अचानक भूकंपाची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये काही काळ चर्चेचा विषय बनला होता. मात्र, या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यास इमारतीतील सुरक्षित ठिकाणी थांबावे, खिडक्या व जड वस्तूंपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT