वसंत सावंत
जत : दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यावर यंदा पुन्हा एकदा भीषण पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. उन्हाची तीव्रता, कमी झालेला पाऊस आणि आटत चाललेले तलाव यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेड्याळ, माडग्याळ, सिंदूर, कोळगिरी आदी भागामध्ये नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.
शेड्याळ गावात सध्या परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. गावातील विहिरी आणि बोअरचे पाणी कमी झाल्याने महिलांना डोक्यावर हंडे घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत आहे. माडग्याळ परिसरातही पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. व्हसपेठ तलाव आटल्याने परिसरातील भूजल पातळी वेगाने खाली गेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. गावात चार ते पाच दिवसातून एकदा पाणी येत आहे.
दरम्यान, जत तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणी साठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोसारी तलावात फक्त 3.65 टक्के, शेगाव क्र. 1 मध्ये 4.75 टक्के, उमराणीमध्ये 9.93 टक्के, गुगवाडमध्ये 10.16 टक्के आणि डफळापूरमध्ये 11.35 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मिरवाड तलावात केवळ 1.94 टक्के पाणी उरले असून दरीबडची तलावात तर अवघा 1.34 टक्के साठा शिल्लक आहे. तिकोंडी क्र. 1 लघु पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडला असून तेथे शून्य टक्के पाणीसाठा नोंदवला आहे.
तालुक्यातील काही तलावांमध्ये तुलनेने समाधानकारक पाणीसाठा असला तरी परिस्थिती गंभीरच मानली जात आहे. बिरनाळ तलावात 40.77 टक्के, संख मध्यम प्रकल्पात 42.09 टक्के आणि तिप्पेहळी तलावात 30.57 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र उन्हाची तीव्रता लक्षात घेता हा साठा किती दिवस पुरेल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक गावांमध्ये टँकर सुरू करण्याची मागणी होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.