जत पंचायत समितीकडील कनिष्ठ अभियंता ‌‘लाचलुचपत‌’च्या जाळ्यात 
सांगली

Sangli Bribery Case : जत पंचायत समितीकडील कनिष्ठ अभियंता ‌‘लाचलुचपत‌’च्या जाळ्यात

शाळाखोल्यांच्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी 88 हजारांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जत : शाळेतील वर्ग खोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती बिल तयार करून ते जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी 88 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जत पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. संजय भगवान सुतार (वय 51, रा. शिवशंकर थिएटरजवळ, मिरज) असे त्याचे नाव आहे. सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी मजूर संस्थेमार्फत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांचे बांधकाम व दुरुस्तीचे काम घेतले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर वर्ग खोल्यांचे बांधकाम व दुरुस्तीचे बिल तयार करून ते मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडील सर्व शिक्षा अभियान विभागाकडे पाठवावे लागणार होते. त्यासाठी जत पंचायत समितीकडील कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) संजय सुतार याने तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदारांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार दि. 24 रोजी जत पंचायत समिती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संशयित सुतार याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार, दि. 25 रोजी सापळा रचला. सुतार याला तक्रारदाराकडून जत पंचायत समितीच्या आवारातील विस्तार अधिकारी निवासस्थान परिसरात लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरूध्द जत पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक यास्मिन इनामदार, निरीक्षक योगेश चव्हाण, निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सागर नायकुडे, वीणा जाधव, चालक विठ्ठलसिंग राजपूत यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT