घरांची पडझड 
सांगली

Sangli Rain : जत, मिरज पूर्व भागाला वादळाचा तडाखा

शंभराहून अधिक घरांची पडझड : कौले पडून तरुणी जखमी; झाडे उन्मळली, विजेचे खांब कोसळले

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जत उत्तर-पूर्व भाग तसेच मिरज पूर्व भागाला बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. जतमधील कुणीकोणूर, आबाचीवाडी, सनमडी, मायथळ व अन्य गावात पाऊस व वादळी वाऱ्याने शंभराहून अधिक घरांची पडझड झाली. कुणीकोणूर येथे अंगावर कौले पडून तरुणी जखमी झाली. जत तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे, वीज खांब कोसळले. मिरज पूर्व भागालाही वादळी वाऱ्याचा तडाखा बसला.

तालुक्यातील सनमडी, मायथळ, कुणीकोणूर, आबाचीवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून गेले. पत्रे, कौले, गवती छप्पर, जनावरांचे गोठे तसेच झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळले आहेत. ज्वारीचे कडवळ जमीनदोस्त झाले आहे.

मिरज पूर्व भागात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. जोराच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. अनेक घरांचे पत्रे, कौले उडाली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तासगाव तालुक्यात अनेक गावांत बुधवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये द्राक्ष शेतीसह आंबा, पेरू, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पलूस परिसरात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिला. आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. कडेगाव तालुक्यात हलका पाऊस झाला. सांगली, मिरजेत वाऱ्यासह हलका पाऊस झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT