हुलजंती यात्रेत पारंपरिक भाकणूक 
सांगली

Sangli Huljanti Yatra| हुलजंती यात्रेत पारंपरिक भाकणूक

पाच राज्यांतील लाखो भाविकांच्या गर्दीत रंगला गुरू-शिष्य पालखी भेटीचा सोहळा

पुढारी वृत्तसेवा

जत : ‘एक विहीर मारील, इंजिन बसेल, मोटार बसेल; पण मोट जुंपली जाणार नाही. कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थेत अनपेक्षित बदल होतील. ऊसवाला सोन्याच्या कडा घालेल, तर एका गाईला शंभर दावे लागतील. शेत स्वस्त होईल आणि बैल महाग होईल. सहा देशांत युद्धाचा भडका उडेल, महागाईचा भस्मासुर होईल,’ अशी लक्षवेधी भविष्यवाणी (भाकणूक) हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे पार पडलेल्या ऐतिहासिक गुरु-शिष्य श्री बिरोबा-महालिंगराया पालखी भेट सोहळ्यादरम्यान वर्तवण्यात आली.

‘खरी भक्ती घट्ट राहील, पोकळ उडून जाईल. राजकारणात प्रचंड उलथापालथ होईल. तांबडे धान्य जास्त पिकेल, तर पांढरे धान्य महाग होईल. चालू वर्षात पाऊस कमी होईल; पण पुढच्या रोहिणी व मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडेल. जगात पुण्य कमी होऊन पाप वाढले असून प्रत्येकाने नीतीमार्गाने वागावे लागेल,’ अशा विविध विषयांवरील पारंपरिक भाकणुकीने लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

‘भू-कैलास यलो फेस्टिव्हल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुलजंती यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘श्री महालिंगराया-बिरोबाच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषात लोकर, खारीक, खोबरे आणि भंडारा उधळत हा ऐतिहासिक सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुलजंती येथे गुरु बिरोबा व शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा सोहळा रंगला. सोमवारी पहाटेपासूनच मुंडास (आहेर) दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात्रेदरम्यान मंगळवेढा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT