जत : जत तालुक्यातील उमदीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील श्री महालिंगराया देवस्थानची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आणि हालमत संप्रदायाचे ‘भू-कैलास’ म्हणून ख्याती असलेल्या या यात्रेचा मुख्य आकर्षणबिंदू असलेला ऐतिहासिक गुरु-शिष्य पालखी भेट सोहळा आज, सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता रंगणार आहे.
हुन्नूरचे गुरू श्री बिरोबा आणि शिष्य श्री महालिंगराया यांच्या पालख्यांचा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा येथून लाखो भाविक दाखल झाले आहेत. यात्रेच्या मुख्य दिवशी महालिंगरायाला नैवेद्य अर्पण करण्याचा मान जतच्या डफळे संस्थानिक राजघराण्याला असून, ही पूर्वापार परंपरा आजही जपली जात आहे.
मुख्य भेटीच्या आदल्या दिवशी रविवारी मध्यरात्री बारा वाजता मंदिरात ‘मुंडास सोहळा’ पार पडला. कैलासातून शंकर-पार्वती येऊन महालिंगराया मंदिराच्या पंचशिखराला (मुंडास) आहेर करतात व मूक भाकणूक होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा विधी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सात मानाच्या पालख्या भेटीचा सोहळा
आज दुपारी देवस्थानजवळ वाहणाऱ्या हालहळ ओढ्यात बिरोबा व महालिंगराया पालख्यांची मुख्य भेट होईल. तत्पूर्वी सात मानाच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा पार पडणार आहे. यामध्ये बिजर्गीचे बुळाप्पा, जत तालुक्यातील सोन्याळ येथील विठुराया, उटगी येथील ब्रह्मदेव, कर्नाटकातील शिरडोण येथील बिरोबा व शीलवंती, जिरांकलगीचे बिरोबा आणि खसगीचे बर्गालसिद्ध या पालख्यांचा समावेश आहे. भेटीनंतर 'महालिंगराया-बिरोबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात भंडारा, लोकर, खारीक व खोबऱ्याची उधळण केली जाणार आहे. यात्रेनिमित्त देवस्थान परिसरात प्रशासनातर्फे पिण्याच्या पाण्याची आणि वाहनांच्या पार्किंगची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.