सांगली

Jat historic bridges: जतचे दोन्ही ऐतिहासिक पूल धोकादायक

वाली कोण?; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा
वसंत सावंत

जत शहर : जत शहरातील सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधलेले दगडी व लोखंडी पूल आज अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराच्या दोन प्रमुख भागांना जोडणारे हे पूल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे असले तरी, त्यांच्या दुरवस्थेमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालातून पुलांचे गंभीर वास्तव समोर आले आहे. दोन्ही पूल सध्याच्या स्थितीत वापरासाठी पूर्णपणे अयोग्य असल्याचे या अहवालात स्पष्ट केले होते. महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीने 22 फेब्रुवारी 2022 रोजी प्रत्यक्ष पाहणी करून हा अहवाल तयार केला होता.

गंधर्व नदीवर 1912 साली उभारलेला लोखंडी पूल सध्या अत्यंत बिकट अवस्थेत आहे. तीन स्पॅनचा हा स्टील गर्डर पूल असून मुख्य गर्डर्स मोठ्या प्रमाणात गंजले आहेत. परिणामी त्यांची जाडी कमी झाली आहे. पुलावरील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे निकामी झाली असून पाणी साचत आहे. अनेक ठिकाणी गळती दिसून येत असून काँक्रीट निघून लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. या सळयांनाही गंज लागला असून पुलावरील रेलिंगही धोकादायक बनले आहे.

दुसरीकडे दगडी पुलाची स्थितीही तितकीच चिंताजनक आहे. पुलावरील काँक्रीट ठिकठिकाणी तुटले असून सळया उघड्या पडल्या आहेत. ड्रेनेज व्यवस्था योग्य नसल्यामुळे पाण्याची गळती होत आहे. पुलाच्या मूळ संरचनेत मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचे निरीक्षणास आले आहे. हे दोन्ही पूल शहरातील बाजारपेठ, शाळा आणि रुग्णालयांना जोडणारे मुख्य मार्ग असल्याने दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी व वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास मोठी जीवित हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वापरासाठी अयोग्य

दोन्ही पूल 100 वर्षांहून अधिक जुने असल्याने आणि सध्याच्या वाढलेल्या वाहतुकीच्या भारमानानुसार ते सक्षम नसल्याचे अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. “सध्याच्या स्थितीत हे पूल त्यांच्या उद्देशासाठी वापरणे योग्य नाही,” असा ठाम निष्कर्ष तज्ज्ञांनी नोंदवला आहे.

तातडीच्या कार्यवाहीची गरज

जत शहरातील नागरिकांचे जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने या पुलावर अवजड वाहतुकीस तत्काळ बंदी घालून पर्यायी व्यवस्था करणे, तसेच नवीन पुलाच्या उभारणीचा निर्णय घेणे अत्यावश्यक बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT