सांगली : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून जत तालुक्यातील एका दुग्ध व्यावसायिकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांकाची माहिती घेऊन त्याच्या नावावर जीएसटी क्रमांक काढण्यात आला. या जीएसटी क्रमांकाच्या माध्यमातून बोगस व्यक्तीने तब्बल १० कोटी रुपयांची बोगस उलाढाल दाखवून सुमारे दोन कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सुमारे दोन कोटी रुपयांचा आयटीसी अन्य व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यात आला असून, तो घेणारी व्यक्ती मुंबईतील असल्याचे समजते.
जीएसटी विवरणपत्र आणि आयकर विवरणपत्र यांची प्रणालीद्वारे परस्पर पडताळणी होत असते. या प्रक्रियेदरम्यान मायथळ (ता. जत) येथील संबंधित दुग्ध व्यावसायिकाच्या नावावर जीएसटी विभागाकडे दाखविण्यात आलेली सुमारे १० कोटी रुपयांची उलाढाल आयकर विभागाच्या संकेतस्थळावरही निदर्शनास आली. चार्टर्ड अकौंटंटने ही बाब संबंधित दुग्ध व्यावसायिकाच्या लक्षात आणून दिली. त्यावर त्याला मोठा धक्का बसला. कर सल्लागाराच्या मदतीने माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यांच्या नावाचा, कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचे उघडकीस आले. संबंधित व्यावसायिकाने केंद्रीय जीएसटी विभागाशी तसेच पोलिसांशी संपर्क साधून याबाबत तक्रार नोंदवली आहे. फसवणूक झालेल्या दुग्ध व्यावसायिकाच्या नावावर नोंदणी केलेल्या एस. एस. ट्रेडिंगने फर्निचर व स्टेशनरी वस्तूंशी संबंधित व्यवहार केल्याचे दाखवले आहे. आपण फर्निचर, स्टेशनरीसंदर्भात व्यवहार केलेले नसून जीएसटी नोंदणीही केली नसल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.
कर्जाच्या आमिषाने आधार, पॅनचा गैरवापर
कर्ज देण्याचे किंवा अन्य आर्थिक मदतीचे आमिष दाखवून नागरिकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक यांसारखी महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि माहिती घेतली जाते. त्यानंतर या माहितीचा वापर करून बोगस कंपन्या किंवा जीएसटी नोंदणी करण्यात येत असल्याचे प्रकार वाढत आहेत.