महेश गुरव
बिळूर ः बिळूर (ता. जत) येथील आराध्य दैवत श्री काळ भैरवनाथ यात्रा आणि ऐतिहासिक हरभंडी उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. गुलाल-खोबऱ्यांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ‘काळभैरवनाथ की जयऽऽ’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमेवरील भाविकांनी यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
सोमवारी सायंकाळी श्री काळ भैरवनाथांच्या अश्वारूढ मूर्तीचे नागझरी येथून वाजत-गाजत मंदिरात आगमन झाले आणि यात्रेला सुरुवात झाली. मंगळवारी दोन्ही राज्यांतील भक्तांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी ‘श्रीं’ना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. परंपरेप्रमाणे हरभंडी रथावर लाकडी अश्वारूढ मूर्तीची बांधणी करण्यात आली. पहाटे पाच वाजता मंदिर प्रांगणात जाबगौंड व जकगौंड हरभंडी आणण्यात आल्या. सकाळी सात वाजता मानाच्या बैलजोड्या जुंपून या हरभंडी नागझरी येथील मुख्य मंदिराजवळ नेण्यात आल्या.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे खिलार बैलजोड्या. सध्याच्या काळात खिलार बैल सांभाळणे खर्चिक असतानाही, शेतकरी भक्तांनी महिनाभर विशेष निगा राखून तयार केलेल्या 200 हून अधिक बैलजोड्या या हरभंडीला जुंपण्यासाठी आणल्या होत्या. दुपारी 4 वाजता मानकरी बाबा पाटील आणि गुरुबसवेश्वर विरक्त मठाचे बैल जुंपून हरभंडीचे मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर तरुण भाविक मोठ्या संख्येने थिरकले. सायंकाळी माणिकआरती आणि पालखी प्रदक्षिणेनंतर उत्सवाची सांगता झाली.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी बिळूर ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट आणि पोलिस प्रशासनाने चोख नियोजन केले होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मंदिर परिसरात वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली, तर ग्रा.पं. सदस्य परशुराम ठक्कण्णावर यांनी फिल्टर पाण्याचे वाटप केले. मुंबईतील व्यावसायिक देवेंद्र व्हन्ने यांनी दरवर्षीप्रमाणे संपूर्ण मंदिर परिसरात मोफत विद्युत रोषणाई केली होती. पुजारी उमेश भाविकट्टी (महाराज), सागर गडीकर, संजय चव्हाण आदींनी नागझरी परिसरात निरंतर अन्नदानाची व्यवस्था केली. तहसीलदार प्रवीण धानोरकर, पोलिस निरीक्षक संदीप कळेकर, देवस्थानचे अध्यक्ष रामण्णा भाविकट्टी, सरपंच विद्या जकगौंड, उपसरपंच बसगौंडा जाबगौड, बाबा पाटील, नानासाहेब पाटील, ग्रामसेवक आनंदा राठोड आणि सर्व ग्रामस्थ व ट्रस्टींनी यात्रेच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.