दोन गटांत हाणामारी File Photo
सांगली

Sangli Crime : बनाळीत शेतीच्या वादातून दोन गटामध्ये हाणामारी

जत पोलिसात परस्परांविरोधात गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

जत : जत तालुक्यातील बनाळी येथे शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी जत पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली. दोन्ही बाजूचे वृद्ध आणि महिला यामध्ये जखमी झाल्या.

पहिल्या घटनेत गणपती हरिबा सावंत (वय 73, रा. बनाळी) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या गट क्रमांक 1167 मधील शेतात लावलेले भेंडीचे पीक पांडुरंग आबासाहेब सावंत व सोहम पांडुरंग सावंत हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरत होते. हे पाहून गणपती सावंत तिथे गेले आणि त्यांनी पीक नांगरण्याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने हल्लेखोरांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच दगडाने मारून त्यांचे हात व पाय गंभीर जखमी केले. याप्रकरणी जत पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या बाजूने पांडुरंग आबासाहेब सावंत (वय 50, रा. बनाळी) यांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ते गट क्रमांक 1107 मधील शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना गणपती हरिबा सावंत व सुमन गणपती सावंत यांनी तिथे येऊन वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी पांडुरंग सावंत यांना दगडाने मारहाण केली. फिर्यादीच्या सासूलाही जबरदस्तीने जमिनीवर खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून जत पोलिसांनी दुसऱ्या गटातील संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT