सांगली : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा व जतमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह पुतळा समितीचे सदस्य उपस्थित होते.
सांगलीतील नवीन स. नं. 27 जुना स. नं. 260/1 मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास परवानगी मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याबाबत महानगरपालिका प्रशासक सभेत 4 मार्च रोजी ठराव क्र. 198 विषय क्रमांक 7 अन्वये पुतळा उभारण्यास अनुमती देण्यात आली होती. यासंदर्भात पुतळा समिती सदस्यांची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सांगलीत अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर जतमध्येही महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यास मंजुरी देण्यात आली.
यावेळी पुतळा समितीचे सदस्य व माजी नगरसेवक संतोष पाटील, मनगू सरगर, सचिन सरगर, दत्तात्रय ठोंबरे, महापालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पोलिस अधीक्षक, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मिरजेचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींचे पालन करून पुतळा उभारण्यास मंजुरी देण्यात आली. यानुसार महापालिका आता निविदा प्रक्रिया राबविणार आहे.