Jal Jeevan Mission Pudhari
सांगली

Sangli Jal Jeevan Mission: 'जलजीवन‌'चा कोट्यवधींचा गाडा अन्‌‍ अभियंते दुचाकीवर !

आठ महिन्यांपासून चालकांना वेतन नाही; वाहने बंद : गावोगावी दुचाकीवरून पाहणी करण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. मात्र अनेक महिन्यांपासून निधीच नसल्याने कामे ठप्प आहेत. दुसरीकडे कंत्राटी वाहनचालक, कर्मचाऱ्यांना डिसेंबरपासून वेतनच मिळाले नसल्याने त्यांनीही काम बंद ठेवले आहे. परिणामी वाहने थांबून असून विभागाच्या प्रमुख प्रभारी कार्यकारी अभियंता सोनाली पाटील यांच्यावर दुचाकीवरून गावोगावी फिरून कामांची पाहणी करण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हाभरातील शेकडो पाणीपुरवठा योजनांची जबाबदारी आहे. या कामांच्या देखरेखीसाठी कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच इतर अधिकाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने वाहने व वाहनचालक उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र शासनाकडून निधी न मिळाल्याने डिसेंबर महिन्यापासून या सर्व वाहनचालक व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. तब्बल आठ महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून काम बंद केले आहे. वाहनचालकांनीही वाहने उभी केल्याने विभागाचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे.

वाहने उपलब्ध नसल्याने कार्यकारी अभियंता सोनाली पाटील यांना दुचाकीवरून प्रवास करून योजनांची पाहणी करावी लागत आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नसून त्यांनाही स्वतःच्या वाहनांचा वापर करावा लागत आहे.

पावसाळ्यात दुर्गम भागात जाऊन पाहणी करताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना, दुसरीकडे या विभागाकडे अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी अधिकृत वाहनही उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT