Islampur Kodoli ST bus 25 passengers injured
इस्लामपूर : इस्लामपूर आगाराच्या इस्लामपूर - कोडोली एसटी बसला वाघवाडी जवळ आज (दि.१) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यात २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बस प्रवाशांनी खचाखच भरली होती.
याप्रकरणी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, इस्लामपूर आगाराची दुपारी एक वाजता शिवपुरी, लाडेगाव, चिकुर्डे मार्गे जाणारी इस्लामपूर- कोडोली गाडी दुपारी दीड वाजता वाघवाडी च्या पुढे आली होती. एन. डी. पाटील शुगर कारखान्यासमोर बस आली असता अरुंद रस्ता व समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना व रस्त्यावरील खड्डा चुकताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे ही बस रस्त्याकडील झाडावर जाऊन जोरात आदळली.
ही बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. त्यामुळे अपघातानंतर प्रवाशांनी एकच आरडाओरडा चालू केला. बस एका बाजूला कलली होती. झाडाला बस धडकल्यामुळे सुदैवाने बस पूर्ण पलटी झाली नाही. बसचा दरवाजा खाली गेल्याने प्रवाशांना लवकर बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी एसटी बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारगुडे पोलीस पथकासह तसेच इस्लामपूर आगाराचे अधिकारीही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. जखमी प्रवाशांना मिळेल त्या वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात किमान 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.