ईश्वरपूर पालिका 
सांगली

Sangli Politics : अपात्रता रद्दबाबतच्या निर्णयास पुन्हा आव्हान

तक्रारदार जयकर जाधव यांची उच्च न्यायालयात धाव

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे अपात्रता प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात पोहोचले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा आदेश रद्द करणाऱ्या नगरविकास मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात तक्रारदार जयकर दिनकर जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २२७ अंतर्गत रिट याचिका दाखल केली आहे.

सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी १० जुलै २०२६ रोजी नगराध्यक्ष मलगुंडे यांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिला होता. मात्र, राज्य शासनाचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी हा आदेश रद्द केला. या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४४(१)(ई) अंतर्गत दाखल तक्रारीवरील सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला होता. गुंठेवारी नियमितीकरण प्रमाणपत्रातील अट क्रमांक १२ नुसार सेटबॅक क्षेत्रातील बांधकाम काढून टाकण्याची अट असल्याचा मुद्दा तसेच मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालांमध्ये संबंधित बांधकाम सर्व्हे क्रमांक ११ मध्ये असल्याचे नमूद असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या कायदेशीर निष्कर्षाला तक्रारदारांनी आव्हान दिले आहे.

ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधातील वैयक्तिक संघर्ष नसून नगरपरिषदेतील कायद्याचे राज्य, पारदर्शक प्रशासन आणि लोकशाहीतील उत्तरदायित्व टिकविण्यासाठी असल्याचे जयकर जाधव यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी करून दिलेला आदेश कोणत्या कायदेशीर आधारावर रद्द करण्यात आला, याची न्यायालयीन तपासणी होणे आवश्यक असून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढा सुरू राहील.

पदावरून हटविण्याबाबत कलम ५५-१ लागू

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध नगराध्यक्षांनी शासनाकडे अपील दाखल केले होते. ३० जुलै २०२६ रोजी तक्रारदारांचा युक्तिवाद ऐकून न घेता स्थगिती आदेश देण्यात आल्याचा आक्षेप याचिकेत नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी राज्य शासनाला दोन आठवड्यांत अपिलाचा निर्णय घेण्याचे निर्देश देत, निर्धारित मुदतीनंतर अंतरिम स्थगिती आपोआप उठेल, असे स्पष्ट केले होते. पुढे १३ नोव्हेंबर २०२६ रोजी नगरविकास मंत्र्यांनी अपील मंजूर करून अपात्रतेचा आदेश रद्द केला. कलम ४४ मधील अपात्रतेच्या तरतुदी नगरसेवकांसाठी असून त्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना लागू होत नाहीत, तसेच त्यांच्या पदावरून हटविण्यासाठी कलम ५५-१ आणि ५५-अ लागू असल्याचे निरीक्षण मंत्र्यांच्या आदेशात नोंदविण्यात आल्याचा मुद्दा याचिकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT