Fraud Pudhari
सांगली

Sangli Financial fraud: ईश्वरपूरमध्ये डॉक्टरला दीड कोटींचा गंडा

कॅथलॅब मशीन पुरवण्याच्या आमिषाने नागपूरच्या तिघांनी फसवले

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : हॉस्पिटलसाठी कॅथलॅब मशीन पुरवण्याच्या आमिषाने एका नामांकित डॉक्टरला १ कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ईश्वरपूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी अश्विन विजय राउत, कुंदन हरीश्चंद्र सिंग आणि शिवम यादव (सर्व रा. रामदास पेठ, नागपूर) या संशयितांविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. सचिन विष्णू सांगरूळकर यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सांगरूळकर यांचे ईश्वरपूर येथे 'लक्ष्मी नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर' रुग्णालय आहे. त्यांनी हॉस्पिटलमध्ये दोन नूतनीकरण केलेल्या कॅथलॅब मशीन बसवण्यासाठी संशयित अश्विन राउत, कुंदन सिंग आणि शिवम यादव यांच्यासोबत एप्रिल २०२३ मध्ये करार केला होता. ठरल्याप्रमाणे डॉ. सांगरूळकर यांनी संशयितांना एकूण १ कोटी ५७ लाख ४४ हजार रुपये दिले होते.

मात्र, पैसे घेतल्यानंतर संशयितांनी डॉ. सांगरूळकर यांना केवळ एकच मशीन पुरवले आणि तेही नादुरुस्त होते. कराराप्रमाणे दुसरे मशीन देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. डॉ. सांगरूळकर यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. सांगरूळकर यांनी ईश्वरपूर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. ईश्वरपूर पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

टोळीचे कारनामे चर्चेत

संशयितांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका डॉक्टरचीही मशीन पुरवण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. आंतरराज्य टोळीने आणखी किती डॉक्टरांना अशा प्रकारे गंडा घातला आहे, याचे कारनामे पुढील तपासात समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT