ईश्वरपूर : ईश्वरपूर एमआयडीसीतील ‘श्री शारदा कागद उद्योग’ या कंपनीतून ८५ हजारांचे तयार कागदी बॉक्स चोरून नेल्याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली. संजीव रामराज कुमार, बुद्धराज केवट आणि अंशु शत्रुघ्न केवट (तिघे सध्या रा. आनंदनगर, ईश्वरपूर; मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत; तर अमित कांबळे, आर्यन कांबळे (दोघे रा. मिरज) हे दोघे पसार झाले आहेत.
हा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी कंपनीचे मालक रामकृष्ण रामकुमार शुक्ला (रा. कृष्णा कॉलनी, कुपवाड फाटा, सांगली) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरुवारी रात्री काहीजण कंपनीत शिरल्याची माहिती मालक रामकृष्ण शुक्ला यांना मिळाली. त्यांनी कामगारांसह कंपनीत धाव घेतली.
यावेळी कंपनीचे मुख्य गेट उघडे दिसून आले. अमित कांबळे, आर्यन कांबळे व अन्य साथीदार तेथे उपस्थित होते. शुक्ला यांनी आवाज देताच अमित आणि आर्यन दुचाकीवरून पसार झाले. उर्वरित संजीव कुमार, बुद्धराज केवट आणि अंशु केवट यांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र शुक्ला व कामगारांनी पाठलाग करून या तिघांना जागीच पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.