ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेकडून थकीत घरपट्टी, पाणीपट्टी व गाळाभाडे वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. थकीत वसुलीसाठी शनिवारी 39 नळ कनेक्शन तोडण्यात आले. जे गाळेधारक थकबाकी भरणार नाहीत, त्यांचे गाळे सील करण्यात येणार आहेत. तसेच थकबाकीदारांची नावे डिजिटलवर लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
पालिकेने नळधारक थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करणे, व्यापारी गाळे सील करणे, थकीत मालमत्तांची जप्ती मोहीम सुरू केली आहे. यामध्ये शहरातील राजेबागेश्वर नगर, अनंतनगर, मंत्री कॉलनी, आंबेडकरनगर, साठेनगर, महादेवनगर, केएनपी नगर, आष्टा नाका, माळी गल्ली, बेघर वसाहत, महादेवनगर अशा विविध भागात नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये 39 पेक्षा जास्त मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तसेच कारवाई करवसुली पूर्ण होईपर्यंत चालूच राहणार आहे.
या कारवाईसाठी नगरपरिषदेकडून दोन विशेष वसुली पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमार्फत थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर दि. 15 मार्चनंतर अशा थकबाकीदारांची नावे शहरातील विविध मुख्य ठिकाणी बोर्डवर प्रसिद्ध केली जाणार आहेत. दि. 19 मे 2025 पर्यंत असलेल्या थकीत रकमेवरील 2 टक्के शास्ती माफीकरिता नगरपरिषद हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली अभय योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत दि. 31 मार्च पर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत . तरी जास्तीत जास्त संख्येने थकबाकीदारांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. कर भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत सर्व शासकीय सुटीच्या दिवशीदेखील कर संकलन केंद्र चालू ठेवण्यात येणार आहे. सर्व मालमत्ताधारकांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाड्याची रक्कम भरून पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.