इस्लामपूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी महिन्याला 4 टक्के परताव्याचे आमिष दाखवून 14 जणांना 2 कोटी 96 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पाच जणांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र महादेव यादव (वय 42), दीपाली जितेंद्र यादव, योगेंद्र महादेव यादव (तिन्ही रा. बनेवाडी ता. वाळवा), प्रकाश साहेबराव पाटील (वय 54), नंदा प्रकाश पाटील (वय 50, दोन्ही रा. नेर्ले) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पिलाबाई सीताराम पाटील (वय 75, रा. नेर्ले, ता. वाळवा) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांविरोधात आणखी 13 जणांनी तक्रार दिली आहे. 8 एप्रिल 2019 ते डिसेंबर 2023 चे दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार इस्लामपूर येथील वैष्णवी एंटरप्रायझेस येथे घडला होता.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सहा वर्षांपूर्वी जितेंद्र व प्रकाश हे दोघेजण पिलाबाई यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांचा मुलगा बंडू होता. त्यांनी पिलाबाई व त्यांच्या मुलाला आमिष दाखवले. वैष्णवी एंटरप्रायझेस ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारी फर्म आहे. त्यामध्ये पैसे गुंतवल्यास 4 टक्के नफा मिळेल, गुंतवलेल्या मुद्दलाची रक्कम एका वर्षानंतर परत केली जाईल. व्यवहारची खात्री म्हणून सुरक्षिततेसाठी वैष्णवी एंटरप्रायझेस फर्मचे धनादेश दिले जातील, असे जितेंद्र व प्रकाश यांनी सांगितले. त्यानंतर पिलाबाई, त्यांचा मुलगा बंडू, सून सविता यांनी वैष्णवी एंटरप्रायझेसमध्ये 9 लाख 50 हजार रुपये गुंतवले. त्यांना 4 लाख 46 हजार रुपयांचा परतावा मिळाला.
ऑक्टोबर 2022 नंतर पिलाबाई यांना परतावा मिळणे बंद झाले. पिलाबाई व त्यांचा मुलगा बंडू हे वारंवार इस्लामपूर येथील वैष्णवी एंटरप्रायझेसच्या कार्यालयात जाऊन परतावा व मुद्दल यांची मागणी करू लागले. संशयितांनी परतावा व मुद्दल परत दिली नाही. थोड्याच दिवसात वैष्णवी एंटरप्रायझेसचे कार्यालय बंद पडल्याचे त्यांना समजले. संशयितांनी अशाच प्रकारे अन्य गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यांनीही संशयिताविरोधात तक्रार दिली आहे.
पिलाबाई सीताराम पाटील (5 लाख 46 हजार), अविनाश अशोक फाळके (25 लाख 90 हजार), हेमंतकुमार विश्वासराव बारवडे (47 लाख), नामदेव तुकाराम मोहिते (18 लाख 93 हजार 935), संभाजी आनंदराव पाटील (23 लाख 99 हजार 667), संजय जयसिंग पाटील (23 लाख 50 हजार 110), अनिल शंकर साळुंखे (54 लाख 67 हजार 500), जयकर आनंदा साटपे (16 लाख 80 हजार), आबासाहेब आनंदराव पाटील (16 लाख 80 हजार), विजयसिंह मोहनराव पाटील (2 लाख 20 हजार), माधुरी हौसेराव भोसले (17 लाख 80 हजार), सुभाष नथुराम भोसले (18 लाख 80 हजार), स्वाती सुभाष भोसले (7 लाख 80 हजार), ऋतुराज हौसेराव भोसले (7 लाख 80 हजार), राजाराम वसंत चव्हाण (9 लाख 60 हजार) यांची एकूण 2 कोटी 96 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
गुंतवलेल्या पैशावर महिन्याला चार टक्के रक्कम मिळण्याच्या आशेने तालुक्यातील प्रतिष्ठित लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले. 2 टक्क्याच्या कमिशनसाठी त्यातील काही लोक जितेंद्र यादव याचे एजंट झाले. त्यांनी अनेकांना आमिष दाखवून माया जमा केली. गेल्या तीन-चार वर्षांपासून जितेंद्रचे कारनामे चव्हाट्यावर येत आहेत. त्याच्या विरोधात यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तालुक्यातील ही रक्कम 100 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील अनेक गोरगरीबही यादव याच्या आमिषाला बळी पडले आहेत. काही गुंतवणूकदारांनी शेत गहाण ठेवले, जमीन विकली, सोने मोडले, कर्ज काढले, मात्र आता त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.