Fraud Case Pudhari
सांगली

Sangli Fraud Case : गुंतवणुकीच्या आमिषाने १६ लाखांची फसवणूक

एकावर आटपाडी पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये पैसे गुंतवून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आटपाडीतील एका फर्निचर व्यावसायिकाची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अभिजित तात्यासाहेब साळुंखे (रा. आवळाई, ता. आटपाडी) याच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धर्मराज शशिकांत सुतार (वय ३०, रा. कल्लेश्वर मंदिराजवळ, आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल २०२१ ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत संशयित अभिजित साळुंखे याने सुतार यांना सोन्या-चांदीच्या दागिन्यांमधील गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाला बळी पडत सुतार यांनी त्याला वेळोवेळी ५ लाख आणि ११ लाख अशी एकूण १६ लाख रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे दिली. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये लेखी करारही करण्यात आला होता.

मात्र, रक्कम घेतल्यानंतर मुदत उलटूनही अभिजित याने मुद्दल अथवा परताव्याची रक्कम परत केली नाही. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे सुतार यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT