सांगली : सांगलीवाडी येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन उचकटून पळवून नेणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीतील दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील तब्बल ११ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
बहादूर प्रल्हादराम चौकीदार बावरी (वय ३६, रा. कुलियाना, जि. डिडवाना, राजस्थान) आणि गोपाल तेजाराम बावरी (वय ३४, रा. रावलियावास, जि. नागौर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यातील त्यांचा तिसरा साथीदार अर्जुन प्रेमाराम मेघवाल (रा. राजस्थान) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दि. १६ सप्टेंबररोजी रात्री सांगलीवाडी येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळवून नेले होते. या घटनेच्या तपासादरम्यान संशयित राजस्थान पासिंगच्या कॅम्पर गाडीतून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोन्ही संशयितांना गाडीसह ताब्यात घेतले.
गाडीची तपासणी केली असता त्यात गॅस सिलिंडर, गॅस कटर, लोखंडी टॉमी, दोरखंड आणि चोरीची दुचाकी मिळून आली. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी सांगलीवाडी येथील एटीएम मशीन गाडीला दोरखंडाने बांधून उचकटल्याची आणि कसबे डिग्रज रस्त्यावरील उसाच्या शेतात नेऊन गॅस कटरने कापून रोख रक्कम काढून नेल्याची कबुली दिली.
गुन्हा करण्याची पद्धत...
ही टोळी अत्यंत शिताफीने गुन्हे करत होती. ज्या भागात चोरी करायची आहे, तिथून ५० ते ६० कि.मी. अंतरावर ग्रामीण भागात भाड्याने खोली घेऊन संशयित राहायचे. रेकी करण्यासाठी ते परिसरातील दुचाकी चोरी करायचे. कमी लोकवस्तीच्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन चारचाकी गाडीला दोरखंड बांधून उचकटायचे व शेतात नेऊन गॅस कटरने कापून पैसे काढून पसार व्हायचे.
४० पेक्षा जास्त गुन्ह्यांची पार्श्वभूमी
अटक करण्यात आलेल्या बहादूर चौकीदार याच्यावर ३० पेक्षा जास्त, तर गोपाल बावरी याच्यावर ४० पेक्षा जास्त एटीएम चोरीचे गुन्हे विविध राज्यांत दाखल आहेत. या कारवाईमुळे नाशिक, सोलापूर, नांदेड, सातारा तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील एटीएम चोरीचे व वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपासासाठी संशयितांना सांगली शहर पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.