सांगली

Sangli Crime: खुनी हल्ल्यातील जखमी पतीचाही मृत्यू

संशयितावर दुहेरी खुनाचा गुन्हा; कुपवाडमध्ये संशयिताचे शेड पाडले

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : घरामागे कचरा टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून शनिवार, दि. १५ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयित फरीद अब्दुल शेख याने मनीषा केसरेकर या महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली होती. त्यावेळी त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्याही डोक्यात त्याने हातोड्याने हल्ला केला होता. मोहन यांच्‍यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवार, दि. १८ रोजी सकाळी त्यांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित फरीद शेख याच्या विरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मोहन केसरेकर याचे नातेवाईक, हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी संशयित फरीद शेख याचे शेड काढल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने मिरजेतील शासकीय रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मिरजेतील शासकीय रुग्णालयात येऊन नातेवाईकांची समजूत काढली. या घटनेची चार्जशीट १५ दिवसांत पाठविण्याचे आश्वासन दिले.

पोलिस अधीक्षक दोशी, मिरजेचे उपअधीक्षक अजय कोकाटे, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. अखेर मंगळवारी दुपारी प्रशासनाने संशयित फरीद शेख याचे शेड हटवल्यानंतर तणाव निवळला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी केली.

मोहन यांचा मृतदेह विघ्नहर्ता काॅलनीतील त्याच्या घरी काही वेळ आणण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बेळगाव जिल्ह्यातील हेब्बाळ या मूळ गावी नेला. दरम्यान, संशयित हल्लेखोर फरीद शेख याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवार, दि. १८ रोजी सकाळी कुपवाड पोलिसांनी त्याला दवाखान्यातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT