Drought Scarcity Pudhari
सांगली

Sangli News| वाळवा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करा

पंचायत समितीच्या सभेत मागणी; आरोग्य विभागाचे अभिनंदन

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : पावसाच्या कमतरतेमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही भागांत खरीप हंगाम हातातून गेला आहे, तर काही ठिकाणी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून वाळवा तालुक्याचा तत्काळ दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणी वाळवा पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी केली.

ही सभा सभापती उदयसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी गटविकास अधिकारी आबासाहेब पवार आणि उपसभापती प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सभापती उदयसिंह पाटील म्हणाले, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावरील विकास आराखड्यांना शासनस्तरावरून मंजुरी मिळाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर कामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात केली जाईल.

दरम्यान, चार जिल्ह्यांमध्ये वाळवा तालुक्याच्या आरोग्य विभागाने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, तसेच येडेमच्छिंद्र आरोग्य केंद्राने दुसरा व कामेरी आरोग्य केंद्राने पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले.

सभेत वीज वितरण कंपनीच्या कारभारावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदस्य प्रदीप पाटील यांनी तालुक्यातील भारनियमनाचा मुद्दा उपस्थित करत वीज वापराबाबत कोणताही भेदभाव करू नये, अशी सूचना केली. इटकरे गावात शंभर टक्के वीज बिल वसुली होऊनही पुरेशी सेवा मिळत नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. शुभांगी पाटील यांनी बावची-भडकंबे रस्त्यावरील विजेच्या तारांची समस्या मागणी करूनही प्रलंबित असल्याचे सांगितले.

सुरूल ते ओझर्डे मार्गावर झाडांच्या फांद्यांमध्ये विद्युत वाहिन्या अडकल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे; त्यामुळे महावितरणने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रेश्मा गुरव यांनी केली. किल्ले मच्छिंद्रगडच्या सदस्या स्वाती मदने यांनी लोंबकळणाऱ्या विद्युत तारांच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी सूचना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT