तासगाव : तासगाव तालुक्यात येरळा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीचा उच्छाद आता नागरिकांच्या जिवावर बेतू लागला आहे. शुक्रवारी रात्री तासगाव-विटा रस्त्यावरील वंजारवाडी फाट्याजवळ वाळूने भरलेली एक पिकअप उलटली. विशेष म्हणजे, कारवाईच्या भीतीने तस्करांनी अपघातग्रस्त गाडी तातडीने गायब केली, मात्र रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून गंभीर जखमी झाले आहेत.
येरळा नदीतून वाळू चोरून नेणारी पिकअप वंजारवाडीजवळ भरधाव वेगात असताना उलटली. गाडीतील संपूर्ण वाळू मुख्य रस्त्यावर पसरली. अपघातानंतर पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी तस्कराने आपल्या साथीदारांना बोलावून गाडी सरळ केली आणि पलायन केले. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील वाळू वाहनचालकांना न दिसल्याने अनेक दुचाकी या ढिगाऱ्यात अडकून घसरल्या. यात काही तरुण जायबंदी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास एक चारचाकी वाहनही या वाळूच्या ढिगात अडकले होते, ज्याला बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांची मदत घ्यावी लागली.
येरळा काठावरील शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, नदीपात्रातून ट्रॅक्टर आणि पिकअपद्वारे खुलेआम वाळूची लूट सुरू आहे. मात्र, महसूल विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. महसूल अधिकारी, कर्मचारी आणि वाळू तस्कर यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांमुळेच ही तस्करी फोफावली असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या परिसरात वाळू आणि मुरूम तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकदा अपघात घडूनही पोलीस आणि महसूल प्रशासन या माफियांना रोखण्यात अपयशी ठरले आहे.