सांगली : सांगलीत सध्या भल्या मोठ्या कमान होर्डिंग आणि कॅन्टिलिव्हर होर्डिंगचा सुळसुळाट दिसू लागला आहे. जादा महसूल मिळतोय; भाडे व शुल्क मिळतेय म्हणून सुरक्षितता, संभाव्य अपघात, शहर सौंदर्य या बाबींकडे डोळेझाक व्हायला नको. खोकेनगरीची आता होर्डिंगनगरी होऊ नये, याची दक्षता महापालिकेला घ्यावी लागेल. महसूल मिळतोय म्हणून काहीही चालवू नये. सर्व काही ठराविक मर्यादेत व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
महापालिका क्षेत्रात रस्तोरस्ती आणि चौका-चौकात होर्डिंग, फलक, डिजिटल फलक दिसतात. अधिकृत कमी आणि अनधिकृत जास्त, असा प्रकार आहे. अनियंत्रित जाहिरात फलकांनी शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यावर महापालिकेकडून ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. उलट होर्डिंगचे नवे नवे प्रकार शहरात दिसू लागले आहेत. चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात घडेल, अशा पद्धतीचे कमान होर्डिंग, कॅन्टिलिव्हर होर्डिंगही रस्त्यावर उभारल्याचे दिसत आहे. अशा फलकांना पोलिसांच्या वाहतूक शाखेने तसेच महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी कशी काय दिली, असा प्रश्न आता नागरिकांमधूनच उपस्थित होत आहे.
एकाच खांबावर उभे राहून पुढे आलेले ओव्हरहँगिंग मोठ्या होर्डिंगबाबत पुरेश दक्षता घेणे गरजेच आहे. अशा होर्डिंगची रचना कमकुवत असल्यास ते कोसळण्याचा धोका असतो. चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात घडण्याची शक्यताही वाढते. महसूल मिळतो, पण सुरक्षितता, शहर सौंदर्य या बाबीही तितक्याच महत्वाच्या आहेत. मुख्य चौक, बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी अशी होर्डिंग दिसतात. ही होर्डिंग अपघातास कारण ठरू नयेत.