सांगली : कोल्हापूर रोडवरील माई ह्युंदाई या शोरूममध्ये चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. या चोरीमागे गुजरातच्या टोळीचा हात असल्याचे तपासात समोर आले असून टोळीचा प्रमुख दिनेश गजेंद्र मोहिते (वय 27, रा. लवाछा, ता. वापी, गुजरात) याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. टोळीतील अन्य चारजणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
मुरली मनोहर पवार (रा. उमरगाव, जि. वलसाड), करण परलाल मोहिते (रा. सायना, मालेगाव जि. नाशिक), रोहित आणि अक्षय (दोघांचे पूर्ण नाव नाही, रा. लवाछा, ता. वापी) अशी पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, कोल्हापूर रस्त्यावर अंकली हद्दीत माय ह्युंदाईचे शोरूम आहे. बुधवार दि. 11 जूनरोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी शोरूममध्ये मागील बाजूने प्रवेश केला. जिन्याखाली असणार्या कॅशियर कक्षाजवळ तिघे चोरटे आले. कॅशियर केबिनच्या दरवाजाला अलार्म असल्याने दरवाजा न उचकटता काऊंटरवरील काच काढून केबिनमध्ये प्रवेश केला. तेथील तगडी तिजोरी उचलून बाहेर आणली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली व तिजोरीतील 9 लाख 68 हजारांची रोकड लंपास केली.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने तपासाच्या सूचना केल्या. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी पथक नियुक्त केले होते. या पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे गुजरात राज्यातील लवाछा गावातील संशयित दिनेश मोहिते याची माहिती मिळाली. पथकाने गुजरात गाठून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर चौघा साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी संदीप पाटील, बसवराज शिरगुप्पी, श्रीधर बागडी, सुशील म्हस्के, संदीप नलवडे, प्रकाश पाटील, ऋतुराज होळकर, अभिजित माळकर, सुमित सूर्यवंशी, सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने केली.
संशयित दिनेश मोहिते हा गुजरातमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडी आणि गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. गांजा वाहतुकीच्या एका गुन्ह्यात वलसाड न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. या गुन्ह्यात तो पाच वर्षे जेलमध्ये होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.